हिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...
हिचा हात घट्ठ हातात पाहीला जरा धरुन
तुझ्या माझ्या सार्याी जागा पाहिल्या पुन्हा फिरुन
विसर विसर विसरताना पाहिल तुला स्मरुन
तु होतीस, नव्हतीस पण हिच हासणं होत
तुझं नसणं आणि हिच असणं होत
खरं सांगू हिच्या डोळ्यात माझं च फसणं होतं
हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...
असे तसे कसे तरी जगतात काही जण
तसं हिला जरा जरा कळतं माझं मन
संध्याकाळी गप्प होतो हे ही हिला कळलं
तुझी बाजू घेउन हिने खुप मला छळलं
खरंच मला ठाऊक नाही हिच जुनं काही
कुणास ठाऊक का, मी विचारलं ही नाही
आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलं-बुरं
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...
तुझ्यासारखा आता मि कारण नसता हसतो
कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो
तुझी आठवण येते आहे हिला आधी कळतं
माझ्याआधी डोळ्यांमधून हिच्या पाणी गळतं
ओठ ठेवते गालांवरती समजून घेते खुप
भळभळणार्याा जखमेवरती हे असं साजूक तूप
जगण्यासाठी आता मला एवढंच सुख पूर
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...
- सौमित्र उर्फ किशोर कदम