I,MeMyself

I,MeMyself

Monday, November 2, 2015

करार झाले

करार झाले
तुझे नि माझे नको तेवढे करार झाले
बुडलो आपण, अन् नाते सावकार झाले

इतकी अडचण झाली प्रेमापायी त्यांची
कितीक होकारही शेवटी नकार झाले!
तुला नकोसा आहे हे माहीत असुनही
खुळ्या मनाशी हवेहवेसे विचार झाले
करून झाले मनासारखे हरेक वेळी
वरवर नंतर फक्त खुलासे चिकार झाले
वेडा झालो तिच्याचसाठी, तिला समजले!
तिचे बहाणे हळूहळू मग हुशार झाले
बरेच झाले, मजला केवळ दु:ख मिळाले!
तिच्या बिचार्‍या सुखात वाटे हजार झाले
हिशेब माझ्या शब्दांचा एवढाच आला -
रूतले, चुकले अन् काही आरपार झाले
जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले
नचिकेत जोशी

Sunday, November 1, 2015

पानिपत युद्धाच्या वैशिष्ठपूर्ण आणि विस्मयकारक नोंदी

पानिपत युद्धाच्या वैशिष्ठपूर्ण आणि विस्मयकारक नोंदी
‪#‎The_Great_Panipat_War‬
* १८ व्या शतकात विश्वात झालेले सर्वात मोठे आणि रक्तरंजित युध्द म्हणून पानिपत च्या तिसर्या युद्धाची दखल जगभर घेतली गेली.
* मराठ्यांतर्फे ४०,००० घोडदळ,हुजुरात,१५००० पायदळ ज्यात ८००० आधुनिक बंदुकधारी गारदी,१५००० पिंडारी,२०० तोफा...असे एकूण ७०,००० सैन्य (त्यांना मदतनीस,बाजारबुणगे १ लाखाहून जास्त होते )
* अफगाण्यातर्फे ४२,००० घोडदळ,बाशगुल,३८००० पायदळ,१०,००० राखीव ,४,००० अब्दालीचे अंगरक्षक (त्यांना नसाक्ची म्हणत),५००० किझील्बाश (इराणी सैन्य),८० तोफा ...एकूण १,००,००० सैन्य
* रणसंग्रामामध्ये मराठ्यांचे ४०,००० तर ३०,००० अफगाणी सैन्य मृत्युमुखी पडले, बाजारबुणगे,मदतनिस,नालबंद,पागा सांभाळणारे,जनाना असे इतर लोकांची मोजदादच नाही ते लाखात असावेत.
* १६६५ च्या पुरंदर युद्धानंतर १०० वर्षात प्रथमच झालेला मराठ्यांचा हा इतका मोठा पराभव होता.
* पानिपत चा युद्धखर्च मराठ्यांना तेव्हाचे ९२ लक्ष म्हणजे आजचे ९५० कोटी रुपये इतका आला.
* मराठ्यांनी दिल्ली जिंकली तेव्हा शहराची अवस्था इतकी बिकट होती कि दुरुस्तीसाठी मराठ्यांनाच तेव्हाचे १५ लक्ष म्हणजे आताचे १५०-१६० कोटी रुपये खर्च करावे लागले.
* पानिपत युद्धाचे वेळी जर शाहू छत्रपती हयात असते तर सर्व सेना एका झेंड्याखाली आणि निशाणाखाली लढली असती आणि मराठे विजयी झाले असते.
* शाह वलीउल्लह च्या जिहादी प्रेरणेमुळे अब्दालीने हिंदुस्तानवर स्वार्या केल्या.
* १७५७ ते १७६१ च्या दरम्यान केलेल्या एकूण लुटीत अहमदशहा अब्दालीने २४ कोटींची संपती लुटून नेली, आजच्या काळातले सुमारे २५,००० कोटी रुपये.
* हिंदुस्तान च्या रक्षणासाठी किंवा राष्ट्ररक्षणाच्या भावनेतून मराठ्यांनी केलेली हि लढाई हे प्रमुख वैशिष्ठ्य होय.तर इथल्या अन्नावर पोसून सुद्धा अफगाण्यान्ची साथ करणारे नजिबखान आणि शुजाउद्दौला राष्ट्रद्रोही निघाले.
* पराभवानंतर मराठ्यांनी केलेली मोर्चेबांधणी,फौजेचे आधुनिकीकरण,युद्धात कुचराई करणार्यांना दिलेल्या शिक्षा, महादजी शिंद्यांनी बदला घेण्याची केलेली भीष्मप्रतिज्ञा या पार्श्वभूमीवर अब्दालीने पुन्हा भारतावर आक्रमण करण्याची चूक केली नाही.
* झालेल्या पराभवानंतर १० च वर्षात मराठ्यांनी पुनर्वैभव प्राप्त केले
* पानिपतच्या युद्धानी मराठी भाषेतसुद्धा म्हणी आणि वाक्प्रचारांची भर घातली, जसे कि -
पानिपत होणे,संक्रांत कोसळणे,१७६० गोष्टी करणे,प्यादाचा फर्जी,भाऊगर्दी,मुरगी मारी बच्चे दानादान,कालचा शेणामेनाचा झाला लोखंडाचा,रानभरी जाहले इत्यादी.
* कुतुबशाह चे मुंडके छाटून,नजीबचे थडगे फोडून आणि हिंदुस्तान वर सत्ता पुनर्स्थापित करून मराठ्यांनी आपला पानिपत चा बदला घेतला अर्थात स्कोर सेटल केला.