औरंगजेबाचे वस्त्रहरण अर्थात सुरतेची पहिली लूट !
#6_to_10_January
डिसेंबर महिन्यात केंव्हातरी साल १६६४ .....
स्थळ - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, लंडन येथील मुख्य कार्यालय
"तो जेव्हापासून येथे येऊन गेला आहे, तेव्हापासून आम्ही सगळेच भीतीच्या छायेखाली सतत वावरत आहोत. असे वाटत आहे की तो पुन्हा येईल आणि तसाच अग्निप्रलय पुन्हा घडेल. तो शहराजवळ आल्याच्या नवनवीन अफवा रोज फुटत आहेत आणि भीतीने लोक सैरावैरा पळत आहेत. जे लोक तेव्हा शहर सोडून गेले, ते अजून आले नाहीत. वीरजी व्होरा, हाजी बेग आणि इतर व्यापारी अजूनही आजारीच आहेत. सर्वशक्तिमान बादशहाने आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण तोच स्वतः हादरून गेला आहे. सध्यातरी इथे शांतता आहे, पण तीही भीषण वाटत आहे. 'तो' पुन्हा येऊ नये म्हणून आम्ही सगळेच देवाकडे प्रार्थना करत आहोत.
आपले विनम्र,
प्रेसिडेंट कौन्सिल सर जॉर्ज ऑक्सिंडेन
सुरत, २६ नोव्हेंबर १६६४."
फेब्रुवारी महिना, साल १६६४....ऑक्सफर्ड महाविद्यालय, इंग्लंड. ब्रिटिश दरबारातील मुद्सद्दी, औषधशास्त्र आणि विज्ञानाचे प्राध्यापक सर थोमस ब्राऊन यांच्या हातात एक पत्र होते. ब्रिटिश राजदूत जॉन एस्केलीयॉट याने सुरतहून २६ जानेवारीला पाठवलेले.... कार्यालयाबाहेर पडता पडता त्यांनी पत्राचा थोडा भाग वाचला.
"५ तारखेची मंगळवारची आमची सकाळ कोतवालाने वाजवलेल्या भोंग्याने झाली. कोणी मोगल सरदार आपल्या १२ हजार फौजेसह येऊन शहराजवळ थडकलाय, अशी पहिली बातमी होती. नंतर कळले, तो आलाय. दख्खनेतील लोक आणि महामहीम बादशहा त्याला राजा म्हणून संबोधतात, ज्याच्या नावाने
दक्षिणेतील सुलतानांना घाम फुटतो, तो ग्रँड रेबेल येतोय.
त्याच्याबद्दल सांगायच झालं, तर उंचीला माझ्यापेक्षा थोडा लहान, पण ताठ आणि उत्कृष्ट बांध्याचा आहे. रोज व्यायाम करून कमावलेले शरीर आहे.प्र सन्न चेहरा, बोलताना मंद स्मित करतो. त्याच्या लोकांमध्ये तो सर्वात गोरा आहे, डोळे भेदक आणि बोलके आहेत. कठोरपणा, शांतपणा, क्रूर, विचारी, दयाळू अशी परस्परविरोधी विशेषणे त्याला देता येतील. त्याच्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे आणि त्याचे लोक त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतात. गद्दारी आणि चूक करणार्याला तो भयानक शिक्षा करतो. बादशहाने त्याच्या रयतेचा केलेला छळ आणि नासधूस याचा बदला घेण्यासाठी, औरंगजेबाला अद्दल घडवण्यासाठीच तो येथे आला असावा..........."
नोव्हेंबर १६६३च्या शेवटी कधीतरी राजगडावर "मुजरा धनी, सुरतंवरनं व्यापारी आल्यात महाराजांना भेटायचं म्हन्त्यात, सोडू का कसं ? " दौलतबंकीने निरोप आणला, राजांनी हात हलवला. त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.
"मुजरा, महाराज!" व्यापारयाने आत येतायेताच पगडी काढली, लांबडा लाडा पायघोळ सोडला, तशी कमरेला लटकवलेली तलवार दिसू लागली. तसा त्याने तलवारी जवळ हात नेला आणि बेलाचं पान काढून हातात घेतलं. "बहिर्जी नाईक जाधव" पुढे सरसावत सरनोबत नेताजी पालकर बोलले. महाराजांनी हसतच विचारणा केली, "नाईक, असेच वेषांतर करून याल, माहीत होतं. काय खबर आणलीत? " बहिर्जींनी एक भला थोरला कागद उघडून महाराजांसमोर पेश केला. "कामगिरी फत्ते झाली धनी, ह्यो सुरतेचा नकाशा. १५० कोस उत्तरेला घोडं मारावी लागत्याल, इनायत खान कोतवाल आन हजारेक लोक असत्याल बंदोबस्ताला. पन शहराला तटबंदी न्हायी ही एक अजून चांगली गोष्ट. महाराज, खासा लष्कर घेऊन जावे, अगणित द्रव्य मिळेल. दुसरी सोन्याची लंकाच हाय जनू. सोनं, हिरे, मोती, रत्न, फिरंगी वखारीतली उंची उडवायची दारू, अरबी घोडे, धान्याची कोठारं, तलम कापड... जे म्हनाल ते मिळतंय हुजूर. सुरत लुटली म्हंजी बादशाच्या कानफटात मारल्यागत हुईल बगा."
कौतुकाने बहिर्जीकडे बघत असलेल्या राजांनी नकाशाकडे नजर फिरवली. सुरत किल्ला, पहारे चौक्या, इंग्रज, डच यांच्या वखारी, इतर महत्वाची स्थाने याबरोबरच वीरजी व्होरा या व्यापार्याच्या घराभोवती ठळक खूण केलेली. हा व्यापारी म्हणजे तत्कालीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रातील सर्वात श्रीमंत असामी होता. तेव्हाचा बिल गेट्स म्हणा हवं तर. भारतात आग्रा, सुरत, भडोच, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रास तर सुरतेमधून जाण्यार्या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ हा एकटा भरत असे. 'सूर्यपुर' असे मूळ नाव असलेल्या या शहरात मोगल, पर्शियन, आर्मेनियन, फ्रेंच, डच, इंग्रज, हबशी, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी असे अनेक वंशाचे लोक व्यापार करत. रोज शेकडो टनांचा माल इथे उतरत असे. हजारो माणसांची सतत येजा असे, आफ्रिकेमधील आणि युरोपमधील अनेक देशांना येथील माल जात असे. फक्त व्यापारी केंद्रच नाही, तर सर्वाधिक महसूल मिळवून देणारे शहर, धनाढ्यांचे शहर म्हणूनही सुरतला संबोधले जायचे. सोनं, चांदी, कापड, मसाले, धान्य, जनावरे, गुलाम अशा सर्व प्रकारच्या वस्तूंचा व्यापार होत असे. पवित्र मक्केला लोक येथूनच जात असत, त्यामुळे सुरतला ‘मक्केचे प्रवेशद्वार’ म्हणत. सुरत म्हणजे एक प्रकारे मोगल साम्राज्याचा मुकुटमणीच होता जणू.
ठरलं तर मग, सुरतच लुटायची! मनाशी निश्चय करत महाराजांनी मोहिमेची आखणी करायला सुरुवात केली. आपल्या माघारी गडकोटांची सुरक्षा पुन्हा एकदा तपासून लावून दिली. सरदारांना, सेनापतींना बोलावणी गेली, खलबतखान्यात सारे जमले. शिवरायांनी सरसेनापती नेताजी पालकर, मकाजी आनंदराव, रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे या मातब्बरांची या मोहिमेसाठी निवड केली. सोबत सुमारे बारा हजार सैन्य होतेच. डिसेंबरच्या मध्याला किंवा शेवटला शिवाजी महाराज राजगडावरून निघाले. त्र्यंबकेश्वरच्या शंभू महादेवाचे दर्शन घेत ४ जानेवारी रोजी सुरतच्या अलीकडे घणदेवी येथे आले. त्या वेळी सुरतचा सुभेदार इनायतखान होता, त्याला शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला की आपण बादशहाचे सरदार असून महाबतखानच्या आदेशावरून उत्तरेतील बंड मोडण्यास निघालो आहोत. इनायातखानाने यावर उत्तर पाठवले की येथील लोक हा प्रचंड फौजफाटा पाहून घाबरतील. तरी आपण शहरातून न जाता बाहेरील मार्गाने जावे. पण मधल्या काळात डच आणि इंग्रज वखारवाल्याने ५ जानेवारीच्या सकाळी पक्की खबर आणली होती की शिवाजीराजे आपल्या बारा हजार सैन्यासह सुरतवर चाल करून येत आहेत. शहरात एकच पळापळ सुरू झाली, व्यापार्यांनी दुकाने बंद करून घर गाठले, शहराच्या सीमेवर राहणार्यांनी तर शहर सोडून भीतीने पोबारा केला. परदेशी व्यापारी आणि वखारवाले इंग्रज, पोर्तुगीज, डच यांनी बाहेर विकायला ठेवलेला माल पुन्हा गोदामात आणून त्याला टाळी ठोकली. इंग्रजांनी तर संध्याकाळी सोडायची जहाजे सकाळीच माल भरून इंग्लंडला पाठवून दिली.
एव्हाना शिवाजी महाराज उधनाजवळ पोहोचले होते. म्हणजे सुरतपासून फक्त १ मैलावर. इकडे शहरात इनायातखानाने लोकांना धीर द्यायचे आणि संरक्षण द्यायचे सोडले आणि स्वताच किल्ल्यात जाऊन लपला. त्याच्यापाठोपाठ इतर अधिकारी, व्यापारी, शहरातील बडी प्रस्थही आश्रयासाठी किल्ल्यात जाऊन बसली. राजगडावर तुटपुंज्या सैन्यानिशी दीड लाखाच्या सेनासागारशी लढणारे संताजी शिळीमकर कुठे आणि हा भित्रा इनायत कुठे... मोगल आणि मराठा यांच्यात इथेच तर खरा फरक होता. शिवरायांचा एकेक मावळा त्यांना शंभर हत्तीचं बळ द्यायचा, तर इनायतखानसारखे भ्रष्ट मोगली अधिकारी त्यांचेच साम्राज्य हळूहळू पोखरत होते. इनायातखानाच्या या भित्र्या धोरणाने मराठ्यांना जणू मोकळे रानच मिळाले. ६ जानेवारीला मराठा सैन्य सुरत शहरात दाखल झाले. शहराच्या बाजूला एक मंडप उभा केला गेला.
महाराजांनी इनायातखानास निरोप धाडला."वीरजी व्होरा, मोहनदास झवेरी, शांतीदास झवेरी, हरी वैश्य, सैद बेग, हाजी कासम या व्यापार्यांनी ताबडतोब येऊन खंडणीची बोलणी करावीत आणि ठरलेली खंडणी द्यावी. खंडणी मिळताच आम्ही निघून जाऊ. अन्यथा आमचे सैन्य शहराला आग लावेल. तुमच्यावर तलवार चालवेल". परंतु या निरोपला मोगली अधिकार्यांकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे चिडलेल्या शिवरायांनी बहिर्जी नाईकांच्या नकाशाप्रमाणे ठरलेल्या ठिकाणांवर हल्ले करून लूट मिळवायची ठरवली. सैन्याच्या छोट्या तुकड्या केल्या गेल्या.
मराठ्यांच्या कोणत्याही मोहिमेत स्त्रिया, लहान मुले, वृद्ध, धर्मस्थळे यांना त्रास दिला जात नसे. हाच शिरस्ता होता, ज्याची नोंद आज्ञापत्रातसुद्धा आहे.
सुरत म्हणजे त्याकाळचे सर्वात मोठे शहर समजले जायचे. तत्कालीन फिरंगी प्रेसिडेंट जॉर्ज ऑक्सिंडेन आणि प्रवासी फ्रान्कोस व्हालेन्तैन यांच्या अंदाजानुसार, त्या काळी सुरातमध्ये सुमारे २,००,००० लाख लोक राहत असावेत. व्यापारासाठी येणारी-जाणारी वेगळीच. शहराला मोठे मोठे चौक होते, व्यापारी पेठा होत्या.
रुपाजी, मानाजी, मकाजी यांच्या नेतृत्वाखाली तुकड्या शहरात घुसल्या. चौकाचौकात तेलाची पिंपे ओतली आणि पेटवून दिले. सरकारी आणि इतर प्रमुख इमारतींना आगी लावल्या. दरम्यानच्या काळात खबर काढण्यास आलेले २ डच, अँथोनी स्मिथ नावाचा इंग्रज वखारवाला आणि काही मोगल लोक महाराजांनी ताब्यात घेतले आणि खंडणीसाठी ओलीस ठेवले.
इकडे इंग्लिश प्रेसिडेंट जॉर्ज ऑक्सिंडेन आणि डच गव्हर्नर अनेट झ्हान यांनी आपल्या वखारी चोख बंदोबस्तात ठेवल्या. मराठे सुरतेच्या किल्ल्यापाशी येऊन थडकले, तसे मोगलांनी संरक्षणासाठी तोफा चालवल्या. पण किल्ला शहराच्या मधोमध असल्याने बाजूच्या इमारतीस तोफांचा मार लागू लागला आणि शहराचेच नुकसान होऊ लागले. प्रकार असा झाला की मोगल स्वतःच मराठ्यांच्या वेढ्यात अडकले होते. मराठ्यांनी त्या दिवशी जकात कार्यालय फोडून पूर्ण साफ केले.
७ जानेवारीला हेरांनी प्रमुख व्यापार्यांची घरे सापडल्याची बातमी आणली. हाजी बेगचे घर लुटण्यास एक तुकडी गेली. महाराजांना हेरांकडून बातमी समजली की मोहनदास झवेरी हा एक सज्जन आणि दानशूर व्यापारी असून गोरगरिबांना मदत करण्याबाबत त्याची ख्याती आहे. हे ऐकल्यावर, मोहनदास झवेरी याच्याकडून खंडणी घेऊ नये व त्याला त्रास देऊ नये असे महाराजांनी आदेश दिले. राजांनी निकोलस कोलेस्ट्रा या ग्रीक व्यापार्यांमार्फत डच आणि इंग्रजांना निरोप पाठवला की शाहसुजाने सुरत मला दिले आहे, त्यामुळे लष्करी मोहिमेसाठी मला पैशांची गरज आहे. लवकरात लवकर खंडणी द्यावी.
शाहसुजा औरंगजेबाचा हा भाऊ २-३ वर्षांपूर्वीच वारला होता. त्यामुळे डचांनी परतीचा निरोप पाठवला की आपले वेंगुर्ल्यातील हितसंबंध लक्षात घेऊन सूट द्यावी आणि शांतता राखावी. मसाले आणि इतर वस्तू खंडणी स्वरूपात घ्या कारण वखारीत आम्ही रोख रक्कम ठेवत नाही. शिवाजी महाराजांनी या निरोपाचा विचार करून माफक खंडणी आकारली. तिकडे इंग्रजांनीसुद्धा कडवा प्रतिकार केल्याने त्यांचा नाद सोडून मराठे पुन्हा शहर लुटू लागले. डचांनी सुमारे २०,००० रुपये खंडणी दिली.
या धामधुमीत मंडपामध्ये एक विचित्र प्रकार घडला. इनायातखानाने वकील म्हणून पाठवलेल्या तरुणाने राजांसमोर काही शर्ती ठेवल्या. त्या वाचून, शिवराय त्यास चिडून काहीतरी म्हणाले आणि शर्ती ऐकण्यास नकार दिला. ते ऐकून, त्या आलेल्या वकिलाने शेल्यात लपवलेला खंजीर काढला आणि शिवरायांना मारण्यासाठी हात उचलला. तोच राजांच्या धारकरी अंगरक्षकांपैकी एकाने सपकन तलवार उपसत त्याचा हात छाटला, तसा तो वकील रक्तबंबाळ अवस्थेत शिवरायांवर पडला आणि ते रक्त राजांच्या अंगरख्यावर लागले. मागे थांबलेल्या मराठ्यांना वाटले, शिवरायांवर हल्ला झाला, म्हणून एका सरदाराने सगळ्या ओलिसांना आणि मोगलांना मारण्याचे आदेश दिले. तसे तिथे असलेल्या लोकांवर शेकडो तलवारी उगारल्या गेल्या. तेवढ्यात महाराज उठून उभे राहिले आणि त्यांनी थांबण्याचे आदेश दिले. या धामधुमीत २४ हात आणि ४ मुंडकी उडाली, अँथोनी स्मिथच्याही गळ्याजवळ आलेली तलवार थोडक्यात थांबली, म्हणून तोही बचावला.
सुरतच्या सुभेदाराने केलेल्या या भेकड हल्ल्यामुळे मराठे अधिकच पिसाळले. त्यांनी टोळ्यांनी फिरून किल्ल्यावर हल्ले करायला सुरुवात केली. बार लावून सरकारी इमारती उडवून दिल्या. सगळीकडे आगच आग दिसत होती. हाजी सैद बेग या व्यापार्याचे घर आणि गोदाम फोडून मराठ्यांनी सगळा ऐवज जमा केला. सगळा लुटीचा माल मंडपाजवळ आणला जात असे, त्यातील काही वाटा सैनिकांना वाटला जात.
८ जानेवारी - या धामधुमीतसुद्धा मराठ्यांनी एकाही मंदिर, मशीद आणि चर्चला त्रास दिला नाही किंवा नुकसान पोहोचवले नाही. फ्रेंच रेवरंड फादर आंब्रोज यांच्याबद्दल आदर दाखवत त्यांच्या कार्याचा शिवरायांनी गौरव केला. "फादर, येथील त्यांचे चर्च आणि त्यांच्या ख्रिश्चन वस्तीला कोणताही त्रास देऊ नये" असे आदेश दिले. त्याचबरोबर कॉन्स्टॅन्टिनोपल येथून निर्वासित म्हणून आलेल्या ज्यू लोकांनासुद्धा मराठ्यांनी आदराची वागणूक दिली. सुरतमधला सगळ्यात मोठा दलाल नुकताच मरण पावला होता. तो अतिशय श्रीमंत होता, पण त्याच्या सदाचारी, दानशूर आणि गरिबांबद्दलच्या कनवाळू वागणुकीमुळे प्रसिद्ध होता. त्याच्या संपत्तीला, घराला किंवा परिवाराला मराठ्यांनी धक्कासुद्धा लावला नाही.
डचांचा म्हणण्यानुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यापार्याच्या म्हणजे वीरजी व्होराच्या घराकडे मराठ्यांनी आपला मोर्चा वळवला.
वीरजी व्होराने आपली जाहीर केलेली मालमत्ता सुमारे (त्या काळचे) ८० लाख रुपये होती. मराठ्यांनी त्याची सगळी गोदामे आणि पेढ्या फोडून साफ केल्या. त्या दिवशी सोने, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे ३०० ते ५०० हशम हातात प्रत्येकी २ पोती घेऊन शामियान्यात दाखल झाले होते. वीरजी व्होराच्या घरातून सुमारे ६००० किलो सोने, २८ पोती भरून मोती, हिरे आणि माणके, सुमारे ५० लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज... ऐवज कसला, साक्षात कुबेराचा खजिनाच जणू खुला झाला होता. इतर व्यापारी आणि दलाल यांच्याकडे मिळून सुमारे ३०,००० किलो सोने आणि हजारेक पोती भरून मौल्यवान साहित्य गोळा झाले. एव्हाना लुटालूट होऊन आता मराठ्यांनी लाकडाच्या वखारी, कापसाची गोदामे, तेलाचे घाणेही पेटवून दिले होते. त्यामुळे जणू अग्निप्रलय झाल्यासारखे सगळीकडे आगीचे आणि धुराचे प्रचंड लोट उठले होते. ग्रीक महायुद्धात TROY शहराची जशी अवस्था झाली होती, किंवा प्रत्यक्ष जळत्या TROYमध्येच उभे आहोत, असा भास होत होता.त्यानंतरच्या दिवशी - म्हणजे ९ जानेवारीला - जमलेला मुद्देमाल एकत्र करण्यास सुरुवात झाली. बैल, खेचरे आणून त्यांच्या पाठीवर पोती, पिशव्या बांधल्या. उरलीसुरली काही लूट घेऊन शहराच्या इतर भागात शिरलेले मराठा सैन्य शामियान्याजवळ येऊ लागले. दरम्यान हेरांनी खबर आणली की महाबतखान मोगली फौज घेऊन भडोचवरून सुरतेकडे येतोय. आता जनावरांवर लूट लादून शहर लवकरात लवकर सोडणे गरजेचे होते.
रविवारी सकाळी म्हणजे १० जानेवारीला शिवाजी महाराजांनी सुरतवरून आपला मुक्काम हलवला. पुढे स्वतः महाराज सैन्यासह शेकडो जनावरांवर लादलेला लुटीचा माल सोने, चांदी, रोकड, हिरे, माणके, मोती, तलम कपडे, अरबी घोडे, मौल्यवान चीजवस्तू असा लवाजमा आणि सर्वात मागे त्याच्या रक्षणासाठी ठेवलेले हजारेक मावळ्यांचे सैन्य पुन्हा राजगडाकडे निघाले.
मोहीम फत्ते झाली होती, औरंगजेबाच्या सल्तनतीचा राजमुकुट महाराजांनी पायदळी तुडवला होता. आलमगीर बादशहाच्या कारकिर्दीवरचा हा सर्वात मोठा डाग होता. हे अलौकिक शौर्य पाहून रजपूत अचंबित झाले होते, मोगल सैन्याचं एकमत झालं होतं की शिवाजी काळी जादू करतो म्हणूनच हे शक्य झालं, तिथे इंग्लंडचे चार्ल्स दुसरे यांना ही बातमी धक्कादायक होती. यामुळे दख्खनेच्या व्यापाराची सगळीच समीकरणे बदलली होती. आता विजापूर आणि मोगल नव्हे, तर फिरंगी दख्खनेत शिवरायांना व्यापारी भत्ता देणार होते. औरंगजेबाबरोबर हातमिळवणी करून शिवरायांचा काटा काढण्याची स्वप्न बघणार्या आदिलशहासाठी हा मोठा धक्का होता.
या लुटीमागचा हेतू शुद्ध आणि सरळ होता. स्वतःच्या स्वार्थासाठी, विलासी जीवनासाठी अथवा रंगमहाल बांधण्यासाठी केलेली लूट नव्हतीच. वारंवार होणार्या मोगली, आदिलशाही हल्ल्याने प्रजा बिथरली होती, अन्न-धान्याचं, मालमत्तेचं अनोनात नुकसान झालेलं, त्यांना भरपाई मिळणं गरजेचं होतं. दुष्काळात आणि धामधुमीत प्रजेला चिरडून, पिळून त्यांच्याकडून सारा वसूल करणारा सुलतान व्हायचं नव्हतं या राजाला, तर प्रजेच्या डोईवर मायेचं आणि संरक्षणाचं छत्र धरणारा छत्रपती व्हायचं होतं. ४-५ लाखाचं खडं सैन्य असलेल्या मोगलांचा वार्षिक महसूल २०-२५ कोटींच्या आसपास, तर मराठ्यांचा जेमतेम कोटी रुपये.
या लुटीमुळे वर्षभर पगारी सैन्य ठेवणं, ते दुपटीने वाढवणं शक्य होणार होतं. गडकोट दुरुस्ती, नवीन कोट उभारणी, आरमाराची बांधणी, दारूगोळा, हत्यारे यासाठी लागणारा पैसा उपलब्ध होणार होता. स्वराज्यासाठी सुमारे अडीच कोटी रोख रक्कम आणि सोने, चांदी इतर वस्तू असा मौल्यवान ऐवज मिळाला होता. औरंगजेबाच्या वस्त्रहरणाचा पहिला अंक संपला होता. महाराजांच्या चेहर्यावर आता नेहमीचे मंद स्मित दिसत होते. राजगडावरच्या त्या प्रसन्न सकाळी जिजाऊ मांसाहेब सोनेरी स्वप्न घेऊनच जाग्या झाल्या..."जे स्वप्नी दिसले ते साकार होईल का? माझा शिवबा खरच छत्रपती झालेला मी पाहीन का?"
Paintings - 1. तापी नदी आणि व्यस्त सुरत शहर !
2.इस्ट इंडिया कंपनी, मुख्य कार्यालय लंडन
3.सुरत वर विजेसारखे तुटून पडलेले शिवराय (By Eeshan Acharya)
4.वीरजी व्होरा
5.इंग्रज वखार
6.डच वखार , सुरत
(* All occurrences of Surat in 6-12 jan 1664 are drafted in one dramatic story)
- लेख संदर्भ -
हॉग ट्रान्सस्क्रिप्ट्स
ईस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड्स १६६१-१६६४
कोर्ट मिनिट्स इन लंडन १६६४-१६६५
दाघ रजिस्टर, बात्विया
मुन्तख्ब-उल-लुबाब - महम्मद खाफीखान
लेटर्स ऑफ सर थोमस ब्राऊन, १६६९
वोयेजेस ऑफ फ्रान्कोस वालेन्तैन
No comments:
Post a Comment