I,MeMyself

I,MeMyself

Monday, May 19, 2014

माझा धर्म इतिहास, माझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची :- अप्पा परब






हाकेसरशी प्राणांचे मोल देणारे मावळे शिवाजीमहाराजांनी तयार केले. किल्ल्यांवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांच्या रूपाने आजही त्यांच्यातील काही जण अस्तित्व राखून आहेत. अप्पा परब नावाचा अवलिया त्यांपैकीच एक. तहान-भूक, नोकरी-व्यवसाय यांची तमा न बाळगता किल्ल्यांच्या वाऱ्या करत इतिहासावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या अप्पांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाशझोत....
प्रत्येक मराठी माणसाची नाळ भावनिकरीत्या छत्रपती शिवाजीमहाराज, रायगड व सह्याद्रीशी जडलेली असतेच. कोणाला बालवयात, तर कोणाला प्रौढ वयात ती उमगते इतकेच. तर, अप्पांचा संबंध सह्याद्री व इतिहासाशी कसा व कधी आला? अप्पा सांगतात, 'अगदी लहानपणापासून मला शिवाजीमहाराज व किल्ल्यांचे आकर्षण होतेच. पाचवीत असताना वयाच्या दहाव्या वर्षी मी वडिलांकडून पाच रुपये मागून घेतले. तेव्हा एसटीचे पुण्याचे तिकीट ३ रुपये १२ आणे होते. मी पुण्याला गेलो व सिंहगड पाहिला. येताना ट्रेनने परत आलो'. वयाच्या दहाव्या वर्षी पाहिलेला सिंहगड जणू अप्पांच्या जीवनक्रमाची सिंहगर्जनाच ठरली.
इतिहास, महाराज व किल्ले यांची पुस्तके वाचत आणि जमेल तेव्हा, जमेल तसे कधी एकटेच, कधी सोबतीने अप्पा किल्ल्यांकडे धाव घेऊ लागले. त्यांच्यातील संकलक आकार घेऊ लागला. पण, इतिहासाच्या वाटेवरील वारकर्‍यांना निखार्‍यांचीच वाट चालावी लागते, याचा प्रत्यय अप्पांना १९७० मध्ये आला. एका इतिहासकाराने नवोदित इतिहासकारांसाठी मार्गदर्शक संस्था काढण्याचा त्यांचा सल्ला निव्वळ नाकारला नाही, तर सपशेल झिडकारला. अप्पांनी तगमग होऊ न देता उलट प्रेरित होऊन संकलक होण्याचा ठाम निश्‍चय केला. स्वत:ला सोसावी लागलेली उपेक्षा इतर इतिहास अभ्यासकांना सोसावी लागू नये, यासाठी माहिती संकलित करण्याचा त्यांनी सपाटा लावला. जो कोणी इतिहास किंवा किल्लेप्रेमी वा अभ्यासक अप्पांकडे येतो, त्याला अप्पा आपल्या ज्ञानाचे व अनुभवाचे भांडार उघडून देतात.
हळूहळू अप्पांसोबत ट्रेक करणार्‍या सह्यवेड्या तरुणाईचा ओघ वाढत गेला. अप्पांसोबत ट्रेक म्हणजे पर्वणीच. ट्रेकर्स अप्पांसोबत रानवाटा, घाटरस्ते, सभोवतालचा परिसर व किल्ल्यांच्या इतिहासाची ओळख करून घेत व तृप्त होत. काही वर्षे अशीच गेल्यावर पुढे अप्पांवर एक संकट कोसळले. अप्पा ज्या गिरणीत कामाला होते, ती गिरणीच बंद पडली. पण, ज्या पद्धतीने सह्याद्री असे असंख्य वज्र घाव झेलत दमदारपणे उभा आहे, अगदी त्याच पद्धतीने अप्पांनी या संकटाला न डगमगता तोंड दिले. अप्पा दादरच्या फूटपाथवर पुस्तके व कॅलेंडर विकून चरितार्थ चालवू लागले. संकटाचे रूपांतर त्यांनी संधीत केले. व्यवसायाला धरून त्यांचे वाचन व लेखन होऊ लागले. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी अनुराधा बाळकृष्ण परब यांची मोलाची साथ मिळाली. ट्रेकर्स व इतिहासप्रेमी त्यांना 'माई' म्हणून ओळखतात. इतिहासवेड्या अप्पांशी त्यांची सप्तपदी झाली व संसारातून वेळ काढून जमेल तसे, जमेल तेव्हा त्या अप्पांची सोबत करू लागल्या. अश्‍चर्य म्हणजे या वयातही अप्पांसोबत जमेल तसे माई गडकिल्ल्यांवर जातात.
१९८० पासून अप्पांमधील वक्त्याला व मार्गदर्शकाला चांगला वाव मिळाला. एका छायाचित्रकार मित्राच्या किल्ल्यांच्या छायाचित्र प्रदर्शनानिमित्ताने अप्पा बोलू लागले आणि पुढे श्रोते ऐकू लागले, ते आजतागायत ऐकत आहेत. अप्पांना किल्लेदर्शनासाठी व वक्ता म्हणून निमंत्रणे येऊ लागली. पण, शक्यतो गडकिल्ल्यांवरच बोलण्याचा आग्रह असे. तेही काहीही मानधन न घेता. कुणी मानधनासाठी आग्रह केलाच, तर 'ही छत्रपती शिवाजीमहाराजांची दौलत आहे. मी ती उधळतोय. त्याचे कसले आले मानधन?', हे अप्पांचे उत्तर असते.
८० चे दशक अप्पांना मिळालेल्या धमक्यांनीही गाजले. अप्पांच्या शास्त्रशुद्ध संकलन व निष्पक्षपाती मांडणीमुळे प्रस्थापितांना धक्का बसला. इतिहासाच्या खुणांची भूगोलाशी सांगड घालत अप्पांनी मांडलेले मुद्दे प्रचलित समज—गैरसमजांना प्रश्न करणारे होते. त्यांचे तर्कशुद्ध विेषण व कारणमीमांसा यांवर चर्चा रंगू लागल्या. त्यांच्या किल्लेदर्शनाच्या वार्‍यांना खीळ घालण्याचे प्रयत्न होऊ लागले. पण, नव्या पिढीतील विचारवंत, ट्रेकर्सनी अप्पांची कास धरली व ते विचार करू लागले.
अप्पांचे लेख 'जिद्द' त्रैमासिकात येऊ लागले. ते गाजले. पुढे ते मासिक झाले व तब्बल २० वर्षे अप्पा 'जिद्द'मधून लिहीत राहिले. पुढे २००० च्या सुमारास अप्पांनी मासिकात लिखाण थांबवले. अप्पांच्या पन्हाळा —विशाळगड वार्षिक वारीतील सहभाग व त्या ऐतिहासिक घटनेवरील माहितीसत्रे गाजली. इथेच ते ट्रेकर्स ग्रुपच्या गळ्यातील ताईत बनले. याच दरम्यान समीर वारेकर नामक व्यक्ती अप्पांना काही मार्गदर्शनासाठी भेटली. अप्पांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाने व विचाराने भारावून त्यांनी अप्पांची संकलने पुस्तक स्वरूपात छापण्याचा मानस बोलून दाखवला. पण, अप्पांनी अट घातली, 'अगदी छापील किमतीत, फक्त प्रिंटर म्हणून तोटा सहन करावा लागणार नाही, इतक्या अल्प मोबदल्यात पुस्तके विक्रीस आणायची.'
'बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरेंसारख्या असंख्य सरदार—मावळ्यांनी प्राणांचे मोल देऊन राखलेल्या छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगण्यासाठी मी पैसे घेऊ?' असा रोख सवाल विचारत अप्पांनी 'ना नफा, ना तोटा' तत्वावर पुस्तके बाजारात आणली आणि इतिहास व दुर्गप्रेमींना बौद्धिक मेजवानीचा अखंड लाभ मिळाला. मनाची श्रीमंती काय असते, याचा प्रत्यय अप्पांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला येतो. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आप्पा परब.
तशी अप्पांची ऐतिहासिक नाण्यांवरही हुकुमत. या आवडीविषयी आप्पा सांगतात, 'पाचवीत असताना मी गावी गोव्याला गेलो होतो. तिथे जुगार खेळण्यासाठी देशी-विदेशी लोक यायचे. लोक जुगारात हरले, की निरनिराळ्या चलनातील नाणी व काही वेळा आंग्लकालीन व मुघल-मराठेकालीन नाणी जिंकलेल्या व्यक्तीला देत असत. मी ती नाणी पाहण्यासाठी कुतूहलापोटी जात असे. एकदा आईने पहिले व दरडवले. पण, नाण्यांच्या अभ्यासासाठी मी तिथे उभा राहतो, हे कळल्यावर आईने तिच्याजवळील नाणी मला दिली व माझा छंद वाढीला लागला.' आप्पा मराठेशाहीतील, तसेच पर्शियन मुघल नाण्यांवर अधिकाराने बोलतात. पण, संग्रह करण्याइतपत अप्पांची परिस्थिती नव्हती. अनेक व्यक्ती व नाणीतज्ञ अप्पांकडे मार्गदर्शनासाठी येतात. मार्गदर्शन पुन्हा विनामुल्यच.
अप्पाना कुणीही व्यक्ती भेटली, कि पहिले ते त्या व्यक्तीचे नाव विचारतात. त्यापुढील दहा मिनिटे त्या व्यक्तीच्या आडनावाचा उगम, इतिहास व भूगोल सांगतात. टी व्यक्ती तत्क्षणी अप्पांची होऊन जाते. इतिहासाचा अभ्यास करता करता त्यात उल्लेखलेली घराणी, मग त्यांचा इतिहास व उगम या बाबतीत आपसूकच अप्पांचा हातखंडा बसला.
सत्कारांपासून आप्पा कायम लांबच राहिले. 'माझ्याकडे संस्था येतात, त्या वार्षिक संमेलनं, हारतुरे सत्कार करण्यासाठी किंवा भाषणासाठी. पण, काही भरीव कामगिरी करून इतिहासाच्या ज्ञानकोशात भर घालण्यासाठी येणाऱ्या संस्था विरळच. मला या सत्कारांमध्ये रस नाही. दुर्दैव महाराष्ट्राचे, कि अधिकांश संस्थांचे कार्य वार्षिक संमेलन भरवण्यापुरतेच मर्यादित राहते,' असे सांगताना अप्पांच्या चेहऱ्यावरची खंत व कळकळ स्पष्टपणे जाणवते.
रायगडावर रोप-वे चा प्रकल्प घोषित झालं, तेव्हा आप्पा उपोषणाला बसले. अप्पांचे म्हणणे होते, की रोप-वेमुळे रायगडचा पिकनिक स्पॉट होईल. आज काही प्रमाणात का होईना, त्याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा त्यांना बोलावून घेतले होते. बाळासाहेबांचे म्हणणे पडले, कि रोप-वेमुले वृद्धांची सोय होईल. त्यावर आप्पा म्हणाले, 'रायगड पाहण्यासाठी म्हातारपणाची वाट का पाहावी? प्रत्येक मराठी माणसाने तरुणपणीच रायगड पाहावा. आपल्या मुलांना लहानपणी रायगडदर्शन घडवावे, जेणेकरून इतिहास व संस्कृतीबाबत संवेदनशील पिढी तयार होईल.' बाळासाहेबांनी शाबासकीची थाप देत हसत हसत निरोप घेतला.
'अलीकडेच लंडन येथील "हाउस ऑफ कॉमन्स' येथे सचित्र शिवचरित्राचे बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ते ब्रिटनच्या लोकसभेत प्रकाशित झाले म्हणून इंग्रजी माध्यमांनी दाखल घेतली. एरवी इंग्रजी माध्यमे शिवाजीमहाराज अथवा मराठ्यांची दाखल घेत नाहीत. याचे कारण मराठी माणसात एकी नाही. शिवाजीमहाराज राष्ट्रीय पुरुष. त्यांना आपण महाराष्ट्रापुरते, मराठी भाषेपुरते व जातीयवादात अडकवून ठेवले. हा त्या राजर्षीचा अपमान आहे,' आप्पा बोलू लागले, की केवळ ऐकत राहावे.
नव्या पिढीकडून अप्पांना काय अपेक्षा आहेत? 'आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व साधने सोयी उपलब्ध असताना तरुण पिढीने पुरातत्व विभागात व पुराभिलेख विभागात संबंधित पदव्युत्तर शिक्षण घेऊन नोकऱ्या कराव्यात. इतिहासाचे प्राध्यापक होऊन नोकऱ्या कराव्यात. आपण शिवछत्रपतींचे देणे लागतो. त्यातून अंशतः मुक्त होण्याचा प्रयत्न करावा,' असे ते सांगतात. अप्पांनी आपली मुलगी शिल्पा परब-प्रधान हिलाही त्याच तालमीत वाढवले. ट्रेकर्सची 'शिल्पाताई' इतिहासात पद्युत्तर आहे व अप्पांचा वारसा पुढे चालवत आहे.
आयुष्याच्या खडतर वाटेवर जागोजागी काटेरी निवडूंग सर्रास पहावयास मिळतात. मात्र, अशाच खडकाळ वाटेवर एखादे सोनचाफ्याचे झाडही बहरते, डवरते व इतर अनेकांची आयुष्यं सुगंधित करते. आप्पा म्हणजे दुसऱ्या प्रकारात मोडणारे अमृततुल्य व्यक्तिमत्व. आप्पा कधी जातीभेद मनात नाहीत. कुठलीही औपचरिक्ता न पाळता अप्पांच्या घरचे दार सर्वांसाठी कायम खुले. 'माझा धर्म इतिहास, माझे दैवत शिवराय. माझी जात गडकिल्ल्यांची. त्या थोर युगपुरुषाने कधी जातीभेत मानला नाही, तर मी का मानू?' इथे इतिहासाच्या वारीतील या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची कहाणी सुफळा आली.
(लेखक इतिहास अभ्यासक आहेत.)

No comments:

Post a Comment